संस्थेविषयी माहिती

कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत

अ.क्र.      मुलभूत माहिती       तपशील
1 स्थापना दि. २८ डिसेंबर १९९५
2 प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात दि. १ जानेवारी १९९६
3 इ-मेल apmcpb@rediffmail.com
4 फोन न. (०२५५०) सभापती- 253232,सचिव- 251287, कार्यालय- 251223
5 सभापतीचे नाव मा. आ. दिलीपराव शंकरराव बनकर
6 सचिवाचे नाव संजय बाळासाहेब पाटील
7 फोन न. (०२५५०) २५१२८७, मो. न. ९८२२४५७६८८
8 उद्धेश शेती उत्पादनाचा माल योग्य रीतीने विकला जावा, तो फसिवला जाऊ नये, तसेच खरीददाराला एकत्रित माल मिळून सरस निरास प्रत
ठरिवणे सोयीचे व्हावे, चांगल्या दर्जाचे शेतीमालाचे उत्पादन होण्यास उतेजन मिळावे हेतूने नियंत्रित बाजार क्षेत्र स्थापन
करणेत आलेले आहे.
9 बाजारक्षेत्र महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१ पुरवणी दिनांक २८.१२.१९९५ रोजी झालेल्या राजपत्रानुसार दि.२८.१२.१९९५ पासून लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन निफाड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत व कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगांव अशा दोन बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या व दि.२८.१२.१९९५ पासुन पिंपळगांव बसवंत बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे ६९ गावांचे झालेले आहे.
10 बाजार आवारे बाजार आवारे :-
कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत चे स्वमालकीची मुख्य व उपबाजार आवारांसह एकूण ५८ हेक्टर (१४५ एकर) एवढे मोठे क्षेत्र
असलेली नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती आहे
* नवीन 100 एकर मध्ये सुपरमार्केट पिंपळगाव बसवंत, क्षेत्र ४० हे.
* हायवे मार्केट (डाळिंब व बेदाणा विभाग), पिंपळगाव बसवंत, क्षेत्र ०४ हे. २०आर.
* भाजीपाला मार्केट (कांदा विभाग) , पिंपळगाव बसवंत, क्षेत्र ०२ हे. ६८ आर.
दुय्यम बाजार आवारे :-
* सायखेडा (कांदा विभाग) क्षेत्र ०५ हे. १० आर.
* ओझरमिंग (भाजीपाला विभाग) क्षेत्र ०२ हे. ६८ आर.
* पालखेड (धान्य व द्राक्षमणी विभाग) क्षेत्र ०१ हे. ७३ आर.
* क. सुकेणे क्षेत्र ०२ हे. ०० आर.
* तात्पुरते ख. वि. केंद्र.शिरवाडे वणी (द्राक्षमणी लिलाव) क्षेत्र ०.४० आर.

बाजार समितीची स्थापना-

     बॉम्बे अग्रीकल्चरल प्रोड्युस मार्केट ऍक्ट १९३९ नुसार पिंपळगाव बाजार समितीची स्थापना दि. २८ डिसेंबर १९९५ रोजी करण्यात आली. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग पुरवणी १ मध्ये १३१० ते १३१३ व्य पानावर मा. श्री मनोहर त्रिभुवन, जिल्हा उपनिबंदक, सहकारी संस्था, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेली दि. २७.१२.१९९५ रोजीची अधिसूचना मध्ये जाहीर केल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, जी. नाशिक असे परिशिष्ट क्रमांक १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल व बाजार समितीच्या प्रत्यक्ष कामकाजास दि. १ जानेवारी १९९६ रोजी सुरुवात करण्यात आली.

     भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान या देशावर अवलंबून आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात शेतीमालाला योग्य भाव मिळत नव्हते म्हणून कर्जात जन्मलेल्या शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असे. ब्रिटिशांनी शेतीमालासाठी स्वतंत्र्य बाजारपेठा निर्माण केलेल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणुक मोठ्या प्रमाणावर होत होती. अनियमीत निसर्गाशी तोंड देवुन त्याने उत्पादित केलेला माल त्याकाळी व्यापारी मनमानी भावाने खरेदी करीत असत. शेतकऱ्याला बाजारभावाची कल्पना नव्हती. त्यामुळे सतत दारिद्र्यात जीवन जगणे त्याच्या नशिबी होते.

     स्वातंत्र्यानंतर राज्य कारभारात शेतकरी वर्गातून निवडुन दिलेले प्रतिनिधी दिसू लागले. सर्वांनी शेती विकासाचा ध्यास हाती घेतला. त्यातुनच १९३९ साली शेतमालाच्या विक्रीस आवश्यक असणाऱ्या बाजारपेठांचा विचार होऊन बॉम्बे अग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट ऍक्ट समंत केला गेला आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा लाभला गेला. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला त्याकाळात परिसरातील शेतकरी, व्यापारी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र आले. आणि त्यांच्या प्रयत्नाने १९४७ साली लासलगांव बाजार समितीची स्थापना झाली व अखेर दि.२८ डिसेंबर १९९५ रोजी लासलगांव बाजार समितीचे विभाजन होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत या संस्थेची स्थापना झाली.

     तसेच बाजार समित्यांच्या निर्मिती आगोदर खरेदीदार परस्पर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतीमाल खरेदी करत असत. तेव्हा खरेदीदार ८० किलोच्या पोत्यात १०० किलो शेतीमालाची भरती करून शेतकऱ्यांची  ८० किलोचे वजनमापाप्रमाणे पैसे देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची  प्रचंड लूट होऊन व शेजाऱ्यांनी विक्री केलेल्या शेतीमालाच्या पैशाची शाश्वती मिळत नव्हती. म्हणून शासनाने बाजार समित्यांची निर्मिती करून शेतकऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून शेतीमालाचे नियमन केलेले आहे. बाजार समित्यांची स्थापना गेल्या ५० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेली आहेत.

 

बाजार समिती स्थापनेचा उद्देश-

         शेतकरी बांधवांच्या मालास योग्य बाजारभाव मिळावे, उत्पादक शेकऱ्यांचा माळ विकण्याची व्यवस्था उत्तम व चोख व्हावी व ती जवळपास असावी. वेगवेळ्या मार्गाने होणारी आर्थिक फसवणूक व पिळवणूक होऊ नये व अनधिकृतरित्या सूट इत्यादी प्रकार बंद व्हावेत, चोख वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख रूपाने त्याच्या पदरात पडावा. इतर संबंधित घटकांच्या हिताची सुद्धा जपवणूक व्हावी इत्यादी उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली.

    शेतीमाल लिलावाच्या पद्धती--

    आजमितीस महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विश्वासपात्र अशा बाजारपेठ असून त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फादेशीर व उत्कृष्ट कामकाज करीत आहेत. स्पर्धात्मक युग असल्याने खरेदीदार बाजार आवारांवर येऊन खुल्या पद्धतीने लिलावात भाग घेऊन मोठ्या प्रमाणावर शेतीमाल खरेदी करून व्यापार करीत आहेत. शेतीमाल खरेदी- विक्रीची प्रक्रिया हि शेतकऱ्यांच्या समोर कोणतीही फसवणूक य करता उघड लिलाव पद्धतीने स्पर्धायुक्त बोली बोलून उच्च बाजारभावाने शेतीमाल खरेदी केला जातो. बाजार समित्या शेतकरी हिताच्या असल्याने बाजार आवारावर शेतीमाल विक्रीस आलेनंतर शेतकऱ्यांना आवश्यक अशा सर्व सुविधा बाजार समितीमार्फत पुरविल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल विक्री करणेसाठी बाजार समित्यांना प्रथम पसंती देत असतो.

     

    कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि.नाशिक चे मुख्य व उपबाजार आवारांवर कांदा, टोमॅटो, धान्य, भाजीपाला, जनावरे, बेदाणा, द्राक्षमणी या शेतीमालाचे लिलाव उघड पद्धतीने होत असतात. बाजार आवारावर कितीही शेतीमालाची आवक असली तरी शेजारी आपला शेतीमाल विक्रीसाठी आलेनंतर नंबर प्रमाणे त्यांच्या शेतीमालाचा लिलाव केला जातो त्यास आवारावर मुक्कामी थांबावे लागत नाही. बाजार समितीत शेतीमालाला योग्य बाजारभाव व शेतीमाल विक्री झालेनंतर २४ तासाच्या आत तात्काळ रोख पेमेंट दिले जाते. बाजार समितीने मुख्य व दुय्यम बाजार आवारावर शेतकरी, व्यापारी, आडते , कामगार यांचेसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शेतीमाल लिलावाच्या सुटसुटीत उघड लिलाव पद्धतीमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील शेतीमाल पिंपळगांव बसवंत चे बाजार आवारावर विक्रीसाठी येत असून दररोज ५०० ते ६०० ट्रॅक्टर व ६०० ते ७०० जीपमधून साधारणतः २० ते २५ हजार क्विंटल कांदा दैनंदिन विक्रीस येतो व टोमॅटो हा शेतीमाल ३ ते ४ हजार वाहनांमधून २० किलो भरतीचे २.५० ते ३ लाख क्रेटस दररोज विक्रीसाठी हंगामामध्ये मुख्य बाजार आवारावर येत असतात.

बाजार समितीचे कामकाज-

पिंपळगांव बसवंत बाजार समितीत कांदा, टोमॅटो व इतर शेतीमाल शेतकऱ्यांचा विक्री झालेनंतर नियमाप्रमाणे २४ तासाच्या आत रोख पेमेंट अदा केले जाते. परंतु येथील व्यापारी तात्काळ विक्री झाल्यानंतर लगेचच पेमेंट देतात हि बाब अतिशय महत्वाची आहे. आजपावेतो बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्री झालेनंतर कोणत्याही शेतकऱ्यांची पेमेंट बाबत फसवणूक झालेली नाही. खरेदीदाराकडून शेतकऱ्यांचे पैसे बुडविले जात नाही ही अभिमानाची गोष्ट आहे.

बाजार समितीचे मूळ उत्पन्न कांदा व टोमॅटो या प्रमुख शेतीमालावर अवलंबून आहे. बाजार आवारावर येत असतात. सादर व्यापाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे रहिवासी पुरावे, ओळखपत्र अथवा त्त्यांचेकडे कोणती मालमत्ता आहे याचा काहीही एक पुरावा नसतो. सदरचे व्यापारी टोमॅटो हा नाशवंत माळ स्थानिक आडते यांचे मार्फत खरेदी करत असतात. सर्व शेतकरी बांधवांचे शेतीमालाचे पैसे देणेची जबाबदारी ही आडत्यांवर असते. संपूर्ण हंगामामध्ये अंदाजे १००० कोटी पर्यंत उलाढाल होते. संपूर्ण हंगामात व आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या टोमॅटो व कांदा या मालाचे एक रुपयासुद्धा बुडत नाही व बुडलेला नाही व अपवादात्मक परिस्थितीमध्ये पैसे राहिल्यास ते काढून देण्याची जबाबदारी बाजार समितीने पूर्ण केलेली आहे. पैसे बुडाल्याची कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार बाजार समितीकडे अथवा शासनाकडे नाही.

 

बाजार समिती अस्तित्वात नसल्यास-

बाजार समित्या अस्तित्वात नसल्यास खरेदीदार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीमाल खरेदी करतील व तेथे स्पर्धा नसल्याने चालू बाजार भावापेक्षा ४० ते ५० रुपये कमी दराने शेतीमाल खरेदी करणेचे व्यापाऱ्यांचे धोरण राहील व अनेक शेतकऱ्यांचे पेमेंट थकवून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झालेनंतर परप्रांतीय व्यापारी/ खरेदीदार शेतकऱ्यांना फसवून त्यांचे शेतीमाल विक्रीचे पेमेंट अदा न करता पळून जातील.

जसे द्राक्ष या शेतीमालाचे व्यवहार बाजार आवारावर होत नाही. परप्रांतीय व्यापारी परस्पर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन हे व्यवहार शेतकरी/ व्यापारी दोघांचे मध्यस्थीने होतात. त्या व्यवहारामध्ये अनेक शेतकरी बांधवांचे पैसे बुडालेले आहे. त्या बाबतीत अनेक वर्तमान पत्रात व पोलीस स्टेशनमध्ये केसेस दाखल झालेल्या आहेत व त्या पैशाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. त्यामुळे ते पैसे शासनाने किंवा कोणत्याही व्यक्तीने काढून दिलेले नसून बुडालेले आहे . याचे मुख्य कारण मध्यस्थी म्हणून कोणीही जबाबदार नाही म्हणून बाजार समितीचे नियंत्रण असणे अत्यंत महत्वाचे आहे.

तसेच सन १९९५ पासून पिंपळगांव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन स्थापना होऊन प्रत्यक्ष कामकाज दि.१/१/१९९६ पासून सुरु झालेले असून आजमितीस कायमस्वरूपी व हंगामी कर्मचारी मिळून १०० ते १२५ कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य बाजार समितीत काम करणेत गेलेले आहे. कर्मचाऱ्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह बाजार समितीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. बाजार समित्या  नसल्यास कर्मचाऱ्यांचा नोकरीचा व त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्व्हचा प्रश्न गंभीर होऊन कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची परिस्थिती येऊन उपासमारीची वेळ येणार आहे.

तसेच बाजार समितीच्या बाजार आवारात शेतीमालाचे वजनमाप व हमालीचे  कामकाज करणेसाठी हजारो कामगार आहेत. बाजार आवारावर शेतीमालाची आवक असल्यास कामगारांना काम उपलब्ध होते व त्यानुसार त्यांना पैसे मिळतात. परंतु शेतीमाल बाजार आवारावर विक्रीस न आल्यास हजारो कामगारांचे कुटूंब बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.

 

हिशोब तपासणी -

आपल्या बाजार समितीची
१) सन २०१३-१४ या वर्षाची सरकारी हिशोब तपासणी श्री.एस.एन. पवार, विशेष लेखा परीक्षक सह. संस्था, वर्ग-१ सह. संस्था(फिरते पथक) नाशिक विभाग नाशिक.
२) सन २०१४ - १५ व २०१५ - १६ या वर्षाची सरकारी हिशोब तपासणी श्री. ए.के. पाटील, विशेष लेखा परीक्षक वर्ग - १ (अधिन विभागीय सह. निबंधक सह. संस्था) नाशिक विभाग नाशिक यांनी केलेली आहे.
३) सन २०१६ -१७ या आर्थिक वर्षाचे सरकारी हिशोब तपासणी संतोष एस. वाघचौरे विशेष लेखा परीक्षक वर्ग १ सहकारी संस्था (आ. वि म.) नाशिक.
४) सन २०१७-१८ ची सरकारी हिशोब तपासणी श्री डी. एन. काळे जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ सहकारी संस्था नाशिक यांनी पूर्ण केली आहे.

 

मुदत ठेव-

बाजार समितीने दरवर्षी शिल्लक राहिलेला वाढावा राष्ट्रीकृत बँकामध्ये दि ३१ मार्च २०१८ पावेतो रुपये ७,२०,३७,२९३.००

 

वाहने-

१) रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिके मार्फत नाममात्र दरात जनसेवा करणारी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत ही एकमेव बाजार समिती आहे.

२) जनतेची सेवा करण्यासाठी वैकुंठरथ मोफत दरात उपलब्ध  करणारी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत ही एकमेव बाजार समिती आहे.

३) शासनाचे आरोयग्यविषयक धोरण लक्षात घेऊन आवारामध्ये साचणाऱ्या खराब टोमॅटो व कांद्यापासून दुर्गंधी व पर्यायाने रोगराईचा फ़ैलाव होऊ नये म्हणून नाशवंत झालेला माल वाहतूक करून बाहेर टाकण्यासाठी पाच (५) ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत.

४) कार्यक्षेत्रातील वेळोवेळो निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन बाजार समितीने स्वनिधीतून ५ पाण्याचे टँकर खरेदी केले आहे.

५) पिंपळगांव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी रक्कम रु.२३.८६ लक्ष खर्च करून नवीन जे.सी.बी. मशीन खरेदी केलेले आहे. अद्यापपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ये-जा करण्यासाठी शिवार रस्ते दोन्ही गावांच्या शेतकऱ्यांच्या हेवादाव्यापोटी प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्यांना रस्त्यासाठी जागा आहे परंतु सदरचा रास्ता शासनाच्या विविध क्लीष्ट अटीमुळे मजबुतीकरण करता येत नाहीत. तसेच दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जलयुक्त शिवाराची कामे करण्यासाठी विविध गावातील नदीपात्रामध्ये बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी, बंधाऱ्यावर भराव टाकण्यासाठी शेतकऱ्यांना तासी सुमारे ७०० रुपये भाडे खर्च करून जे.सी.बी. घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यासाठी सध्याच्या असलेल्या दारात ५०% सवलतीचे दराने जे.सी.बी. मशीन शेतकरी बांधवांना देऊन मोठा दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने दुष्काळाची स्थिती असो कि अति वृष्टी असो अशा कठीण परिस्थितीवर मत करून तयार केलेला उच्च प्रतीचा शेतीमाल नजीकच्या बाजार समितीत आहे त्या स्तिथीत, सुस्थितीत पोहच व्हावा. या दृष्टिकोनातून बाजार  समितीचे सभापती मा.आ. दिलीपराव बनकर यांचे कल्पनेतून पिंपळगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन जे.सी.बी. खरेदी केलेले आहे. जे.सी.बी. मशीन खरेदी करणारी नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती आहे.

६ ) बाजार समितीचे सभापती यांना वेळोवेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तसेच शासकीय कामानिमित्त मुंबई-पुणे येथे जावे लागते त्यासाठी बाजार समितीने टाटा सफारी ही गाडी खरेदी केलेली आहे.

 

अनुज्ञप्तीधारक-

     सन२०१५-१६ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षात खरेदी-विक्रीसाठी बाजार समितीने तिचे मुख्य व दुय्य्म बाजार आवारावर आडते, भाजीपाला आडते, खरेदीदार, तोलणार, हमाल यांना खलिलप्रमाणे अनुज्ञप्ती मंजूर करण्यात आलेली आहे.

 

कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगांव (ब.) जि.नाशिक

अनुज्ञप्ती प्रकार सन २०१५-१६ सन २०१६-१७ सन २०१७-18
जनरल आडते १५३ १६० १७१
भाजीपाला आडते ११९ १२० ११८
अ वर्ग व्यापारी ५०३ ३३५ ३१८
तोलणार ९३ ७१ ६९
हमाल २६९ १८४ १८७
एकूण ११३७ ८७० ८६३