सभापती मनोगत..

 

सभापती मनोगत..

     पिंपळगाव बसवंत कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या दि. १८/३/२००० ते दि. ३१/३/२०१८ या कालावधीत केलेल्या विविध विकास कामाच्या रूपाने आपणासमोर मनोगत व्यक्त करतांना आनंद व दुःखही व्यक्त होत आहे.

     पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होऊन दि. २८ डिसेंबर २०१८ रोजी २३ वर्ष पूर्ण होत आहे. तर लोकशाही मार्गाने निवडणूक होऊन दि. १८ मार्च २००० रोजी पहिले लोकनियुक्त सभापती म्हणून माझ्याकडे बाजार समितीचे सूत्रे सोपविण्यास १८ वर्ष पूर्ण झालेली आहे. सन २००८-२०१५ व सन २०१५-२०२० या कालावधीत झालेल्या निवडणुकीत माझ्यावर निफाड तालुक्यातील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील एकूण ६९ गावांमधील शेतकरी सभासदांनी, हमाल-मापारी बांधवानी विश्वास ठेवत पुन्हा संधी उपलब्ध करून दिली. तर गेल्या १८ वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून निफाड तालुक्यातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत बाजार समितीला एका उच्च शिखरावर पोहचवायचे असेल तर पुन्हा मा.आ.दिलीपराव बनकर यांचेकडे बाजार समितीची सत्ता सोपविणे आवश्यक असल्याचे मत नोंदवत निवडणूक विनविरोधी केली. त्या बद्दल सर्वांचे जाहीर आभार.

     गेल्या १८ वर्षात शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवत शेतकऱ्याच्या विकासाच्या दृष्टीने शेतकरी आपला शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्री साठी घेऊन आल्यानंतर प्रथम येईल त्या प्राधान्याने त्याच दिवशी लिलाव, वजन काटा व २४ तासाच्या आत पैसे घेऊन घरी जाता यावे या पद्धतीने कामकाज केले. हे करीत असतांना इतर बाजार समितीच्या बाजारभावापेक्षा जास्त बाजारभाव कसा देता येईल याचा प्रयत्न केला. यामध्ये शेतकरी, व्यापारी, आडते, गुमस्ते, हमाल-मापारी व कामगार घटकांचे अनमोल सहकार्य मिळाले. यामुळेच आज नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्याती शेतीमाल आपल्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली. आर्थिक नियोजन, स्वच्छ व्यवस्थापन, खर्चात काटकसर व नियमित पारदर्शकता या सूत्रांचा अवलंब केल्याने नवीन १०० एकर जमीन स्वनिधीतून खरेदी करून त्यावर रु. ५५ कोटी ४१ लाखाची विविध विकासकामे पूर्ण करून सर्व सुविधा युक्त अद्यावत असे मा. शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवर उभारले आहे. हे बाजार आवार उभारतांना एक रुपयाचाही कर्ज बाजार समितीवर आज शिल्लक ठेवलेले नाही. या करीत मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या नाबार्ड अंतर्गत २५ टक्के पायाभूत सुविधांसाठी असलेल्या योजनेतून रु.६.१२ कोटी अनुदान मिळविण्यात बाजार समितीला यश मिळालेले आहे.

     बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत असतांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देत, कोसळलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनास मदत करण्यास नेहमीच बाजार समितीचा पुढाकार राहिलेला आहे. चालू वर्षी पडलेल्या दुष्काळाला सामोरे जातांना जनतेला पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी खूप वणवण करावी लागली. या करिता बाजार समितीने ५ ट्रॅक्टच्या माध्यमातून ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा केलेला आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थानच्या मागणीनुसार आणि निफाड पंच्यात समितीच्या शिफारसीनुसार ७० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बाजार समितीच्या स्व-मालकीच्या जेसीबी मशीनने व काही जेसीबी मशीन भाड्याने घेऊन तालुक्यातील ११ गावांमधील नदी, नाले, ओढे, गावातले आदींचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले आहे. याचा उपयोग संबंधित गावांतील शिकारीच्या जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी, शिवार रस्ते करण्यासाठी, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी, परिसरातील जमिनीच्या पाणी पातळीत वाढ करण्यासाठी झाला. बाजार समितीने एवढ्यावरच न थांबता निफाड तालुक्यातील एकूण १० शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती, कर्ज आदींना कंटाळून आत्महत्या केलेली आहे. सदर आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी २५ हजार रुपये रोख अर्थीक मदत व मुलांचे शिक्षणासाठी आवश्यकतेप्रमाणे शैक्षणिक मदत देऊन बाजार समिती हि शेतकऱ्यांची संस्था असून तिचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उपायोग करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे.

     आमचे मार्गदशर्क, देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी देशातील शेतकऱ्यांची अर्थीक व सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी केलेल्या भरीव कार्यांचे आम्हां शेतकऱ्यांना नेहमी स्मरण व्हावे या करता नव्याने १०० एकरमध्ये उभारलेल्या मुख्य बाजार आवारास मा.शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत असे नाव देऊन बाजार समितीच्या वतीने छोटासा सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या नावास आज, उद्या व भविष्यात कोणताही तडा जाणार नाही किंवा नावाला साजेसच अस काम मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून होईल अशी ग्वाही या निमित्ताने आपणाला देत आहे.

     महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दि.५ जुलै २०१६ व २६ ऑक्टोबर २०१८ च्या अध्यादेशाद्वारे कायद्यात सुधारणा करत फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा या शेतीमालाचे बाजार समितीमधील नियमन रद्द केले आहे. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी वारंवार चांगला वाटत असला तरी यामुळे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना बाजार आवाराच्या बाहेर खरेदीस शासनाने अप्रत्यक्षरीत्या परवानगी दिलेली आहे. यामुळे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना बाजार आवाराचं बाहेर खरेदीस शासनाने अप्रत्यक्षरित्या परवानगी दिलेली आहे. यामुळे शेतकर्त्यांच्या शेतीमालाची, विक्रीमधून आलेल्या पैशाची जबाबदारी शासनाने नजरेआड करत द्राक्ष पिकांप्रमाणे व्यवहार करण्यास मूक समंती दिलेली आहे. या एकानिर्णयामुळे बाजार सामितीचे व्यापार्यांवरील वर्चस्व, अधिकार कमी झाले आहे. उद्या मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक आल्यास त्याचा सर्व लिलाव त्याच दिवशी व्यापाऱ्यांकडून करून घेणे, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याकरिता व्यापाऱ्यांवर प्रभाव टाकणेसाठी मर्यादा येणार आहे. तसेच बाजार समिती मार्फत रास्तभाव दुकानदारांकडून वसूल केली जाणारी बाजार फी व देखरेख फी मधून या दुकानदारांनां वगळण्यात आलेले असल्याचा नुकताच शासन निर्णय पारित झालेला आहे. या प्रकारे शासन धोरणानुसार बाजार समितीचे पंख छाटण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे. याचा सर्व परिणाम बाजार समितिच्या उत्पन्नावर होणार आहे. बाजार समिती चालविण्यासाठी, विकासकामे करण्यासाठी, कर्मचारी पगारासाठी व इतर कोणत्याही खर्चासाठी शासन एका रुपयाचाही योगदान किंवा मदत बाजार समितीला करत नाही. या उलट बाजार समिती पणन मंडळास बाजार समिती उत्पन्नाच्या ५ टक्के अंशदान, शासनास ५ पैसे सुपरव्हिजन फी, व्यवसाय कर व ग्रामपंचायत घरपट्टी असे मिळवून दरवर्षी लाखो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करते. गेल्या १६ वर्षांपासून कुटुंबाप्रमाणे या बाजार समितीची देखभाल करून बाजार समितीला राज्यातच नव्हे तर देशात नावलौकिक मिळवूंन दिला, बाजार समितीच्या उत्पन्नात भरघोस वाढ केली. शेकऱ्यांसाठी आपली बाजार समिती म्हणून उदयाला आणली. आणि आज शासनाच्या एका निर्णयामुळे हि बाजार सामिती मोडकळीस येईल कि काय अशी भीती निर्माण झालेली आहे याचे मला मनस्वी दुःख होत आहे.

     शेतकऱ्यांच्या या बाजार समितीसाठी येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरे जाऊन या पुढेही कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत हि कांदा, टोमॅटो, डाळींब, बेदाणा, भाजीपाला व इतर शेतीमालाची आदर्श बाजारपेठ या नावलौकिकात आणखी भर टाकून शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपले, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल-मापारी, कामगार व बाजार समितीच्या संबंधित घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील विविध क्षेत्रातील राजकीय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, अधिकारी, पत्रकार, आदींच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानून आपल्या सर्वांच्या सहकार्याने बाजार समितीच्या झालेल्या प्रगतीचा अहवाल आपणांपुढे सादर करतो.

 

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!